रेल्वे प्रवाशांच्या गळ्यातील ताईत बनलेली कोंकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय "कोकणकन्या" एक्सप्रेसने प्रवासी सेवेची २० वर्ष पूर्ण करत शुक्रवारी २१ व्या वर्षात पदार्पण केले. सुमारे सव्वा कोटीहून अधिक प्रवाशांना वाहून नेणाऱ्या या रेल्वे गाडीला देशभरातील पहिल्या पाच प्रवासी प्रिय गाडयांमध्ये स्थान मिळाले आहे. मुंबईहून गोव्यापर्यंत जाणाऱ्या या गाडीला नेहमीच हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत असून हि गाडी नवनवे उच्चांक गाठत आहे.
२० वर्षांपूर्वी बरोबर २० जानेवारीला कुर्ला सावंतवाडी या मार्गावर ही गाडी सर्वप्रथम धावली. पुढे २६ जानेवारी १९९८ ला ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव अशी नियमित धावू लागली. कोकण रेल्वेमार्गावरील सर्वात लांब गाडी म्हणून तिला मान देण्यात येतो. सुरुवातीच्या टप्प्यात या गाडीला १८ डबे होते. त्यानंतर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या या गाडीला २४ डबे...
more... आहेत.
या गाडीचे अजून एक वैशिष्टय म्हणजे हिला सेमीपॅसेंजर असे प्रवासी वर्गाकडून म्हटले जाते. रत्नागिरी ते मडगाव या विभागात जास्त थांबे असल्यामुळे सेमीपॅसेंजर म्हणतात
कोकणकन्याला असलेले भोजन यान देशभरातील रेल्वे गाडयांमध्ये लक्षणीय आहे. या भोजन यानाला "फुडकोर्ट ऑफ इंडिया" असे म्हटले जाते. खाद्यप्रकार जास्त असल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे. कोकणकन्यासाठी सुरुवातीला २ रेक उपलब्ध होते. त्यानंतर ४ रेक उपलब्ध करून देण्यात आले. कोकणकन्याच्या उपलब्धतेसाठी अशा ४ रेक्स दिल्या होत्या. सद्यस्थितीला ३ रेक्स आहेत.
कोकणकन्या गाडी सुरु झाली तेव्हा ऑनलाईन पद्धतीने सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये झुआरी नावावरून काही नाव या गाडीला द्यावे अशा सूचना होत्या. कोकणकन्या हे नाव द्यावे अशा सूचना सर्वाधिक झाल्याने या गाडीला कोकणकन्या हे नाव देण्यात आले. परतीच्या प्रवासात ही गाडी मांडवी एक्सप्रेस म्हणून प्रवास करते. कोकणातील लोकांच्या सुचनेप्रमाणे एका फेरीला कोकणकन्या हे नाव तर परतीच्या फेरीला मांडवी हे नाव गोव्यातील प्रवाशांच्या सूचनेप्रमाणे देत समतोल साधण्याचा प्रयत्न रेल्वे बोर्डाने केला आहे.
माहिती :- प्रा. उदय बोडस, रेल्वेप्रेमी